Abhyasniti

यशाची रीत सोपी,साथ देईल अभ्यासनीती

अभ्यास

आज पर्यंतचा इतिहास पाहिला तर आपल्या डोळ्यांना ज्या गोष्टी दिसतात किंवा ज्यांचा आपल्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभव येतो, त्या सर्व गोष्टी अभ्यासातून आलेले आहेत. अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही. हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे.
     पूर्वीचे जर ग्रंथ आपण बघितले तर आपल्याला आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही, कारण एवढे मोठे ग्रंथ आपल्या ऋषीमुनींनी कसे लिहिले असतील? त्यांच्याकडे कोणते असे शास्त्र होते? जे त्यांना आळसमुक्त अभ्यासाची सवय लावत होते ,याचाच आढावा आपण घेणार आहोत. आणि या स्पर्धेच्या युगात आपण त्याचा आधार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसे त्याला आजच्या युगातील मेंदुसंबंधीचा अभ्यास आणि संशोधनाचा आधार असेल हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात आपण वेगवेगळ्या कला शिकत असतो, मात्र अभ्यासाच्या कलेशिवाय माणसाचं आयुष्य अपूर्ण असतं. चला तर या कलेचे शास्त्र शिकण्याचा प्रयत्न करूयात.

अभ्यासाची सुरुवात सोप्या विषयाने करा

आजच्या आधुनिक युगात अभ्यासाचा कंटाळा भल्याभल्यांना येतो आणि यात काही नवल पण नाही. कारण, आपण म्हटल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीला एक शास्त्र आहे. तसेच, आपल्या मेंदूलाही सोप्या आणि आवडत्या गोष्टी जास्त आवडतात. याचाच फायदा घेऊन आपण अभ्यासाची सुरुवात करायची आहे. आपल्याला आवडणाऱ्या विषयापासून अभ्यासाला सुरुवात करायची. उदा. एखाद्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अवघड वाटत असेल किंवा त्याला वाचन करायला आवडत नसून खूप वेळ एकाच जागेवर बसण्याची त्याची बैठक नसेल तर अशा वेळेस तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीचे पुस्तक वाचू शकता किंवा एखादी कादंबरी वाचू शकता. हिच पहिली पायरी तुमच्या अभ्यासात आवड निर्माण करण्याची असेल आणि नंतर जसजशी सवय होईल तसे मग आपल्याला अवघड वाटणाऱ्या विषयाकडे वळायचे.

काय केल्यावर किती टक्के लक्षात राहते?

वाचन केलेले20 ते 25%
ऐकलेले30 ते 35%
बघितलेले40 ते 45%
बोललेले50%
स्वतः क्रिया करून पाहिलेले60% पेक्षा जास्त

वाचलेले,ऐकलेले, पाहिलेले बोललेले आणि कृती करून केलेला अभ्यास मात्र 90% लक्षात राहतो या पद्धतीने तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर अभ्यासात खूप छान पद्धतीने होऊ शकतो.

अभ्यासात इंद्रियांना कामाला लावा

मित्रांनो, एखादी गाडी कशी बनते ?तर गाडीला फक्त चाके असून चालेल का ?किंवा फक्त इंजिन आहे आणि चाक नाहीत तरी चालेल का? नाही ना ,अशाच पद्धतीने एखादी गोष्ट एकीने परिपूर्ण होत असते. सांगायचे तात्पर्य अभ्यास करताना आपण एकाच इंद्रियावर ताण देऊन चालणार नाही, तर अभ्यासात शक्य तेवढ्या इंद्रियांचा सहभाग करून घ्या. त्याचबरोबर जर तुम्ही अभ्यासाच्या रूममध्ये चंदनाची अगरबत्ती लावली तर तुमच्या असे लक्षात येईल की तुमचे मन शांत झाले आहे.
इंद्रियांचे काम पुढीलप्रमाणे-

इंद्रिये वापर
डोळेवाचन
कानऐकणे (अभ्यास mobile मध्ये recording करून ऐकणे.)
नाकअभ्यासाची रूम शक्य तेवढी स्वच्छ ठेवा. सुवासिक ठेवा.
तोंड(जीभ)पाठ करणे.
हातलिहणे.

उजळणी अभ्यासाचा एक महत्त्वाचा टप्पा

निसर्गाने मानवाला ‘स्मरण‘ नावाची एक महत्त्वाची देणगी दिलेली आहे. आणि त्याहून महत्त्वाची देणगी म्हणजे ‘विस्मरण ‘ जसे मानवी मेंदूला स्मरण आवश्यक आहे, तसेच विस्मरण ही आवश्यक आहे. मात्र, अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला एखाद्या विषयाचे स्मरण होणं खूप गरजेचं असतं. कारण, त्यावरच आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच जीवन अवलंबून असतं.
     उजळणी करण्यासाठी मित्रांनो तुम्ही ‘369’ चा प्रयोग करु शकता. मला वाटतं याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल .तर जे तुम्ही वाचलेल आहे किंवा ज्या तुम्ही नोट्स काढलेत त्याची उजळणी 3 दिवसानंतर करायची त्यानंतर 6 दिवसांनी उजळणी करायची आणि नंतर 9 दिवसानंतर पुन्हा एकदा उजळणी करायची, त्यानंतर तुम्हाला वाटते की आता आपल्या लक्षात जास्त राहत नाही तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या सोयीनुसार उजळणी करू शकता. या पद्धतीने नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडेल व विस्मरण होण्यापासून तुम्ही वाचाल. त्याचबरोबर झोपायला जाण्यापूर्वी पण तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या नोट्सची उजळणी करू शकता.

स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करा मात्र त्यात एक विचित्रपणा असू द्या

मित्रांनो आपल्या मेंदूला विचित्रपणा खूप आवडतो. तुम्ही जर नीट तुमच्या मेंदूकडे लक्ष दिले तर काही गोष्टी तुम्ही लहानपणापासून विसरला नाही. याचं कारण म्हणजे खट्याळपणा किंवा विचित्र विचार उदाहरणार्थ एखादा मोठा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जसे मी तुम्हाला म्हटलं  सूर्यापासून ग्रहांचे क्रम सांगा तर कदाचित तुम्हाला ते पटकन येणार नाहीत. मात्र ,तुम्ही जर ते एखाद्या विचित्र कोड स्वरूपात लक्षात ठेवले असतील तर ते तुम्ही कधीच विसरणार नाही. जसे की सूर्यापासून क्रमाने येणारे ग्रह  मी एका नावावरून लक्षात ठेवले आहेत उदाहरणार्थ बुशुपृ मंगु शयुने या नावाचा माझा मित्र आहे, त्याच्या वडिलांचे नाव मंगु आहे. तर आडनाव शयुने असे आहे तर बघा क्रमाने येणारे –

बुशुपृ मंगु शयुने

बुबुध
शुशुक्र
पृपृथ्वी
मंमंगळ
गुगुरु
शनी
युयुरेनस
नेनेपच्यून

त्याचबरोबर मंगूच्या मध्ये एक रेष मारली तर मं/गु तर मंगळ पासून अलीकडील ग्रह अंतर्गत गृह होतील तर गुरु पासून चे ग्रह बहिर्ग्रह होतील अशा कितीतरी खट्याळ नोट्स तयार करता येतील ज्याचा वापर तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये होईल. तसेच नोट्स जास्त मोठ्या नसाव्या.शॉर्टकट चा वापर करा.उदा.घट असेल तर “-” वाढ असेल तर”+” तसेच वेगवेगळ्या चिन्हांचा वापर तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये करू शकता.

एखादे पुस्तक अभ्यासताना काय पाहावे

सर्वात महत्वाचं म्हणजे एखादं पुस्तक वाचण्यापूर्वी प्रथम त्याची अनुक्रमणिका ,प्रस्तावना ,त्यांचे संदर्भ ग्रंथ इत्यादी पहावे. परीक्षेसाठी कोणते टॉपिक आहेत. ते पाहावे आणि ते पाठच करावे कारण, त्याला पर्याय नाही. पाठीमागच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले?  याची यादी तयार करा.  संकल्पना नीट समजून घेऊन मगच पुढील अभ्यास सुरू करा.

अभ्यास करताना कुठले प्रश्न पडू द्यावे?

मित्रांनो, कुठल्याही पुस्तकाचा अभ्यास करताना प्रश्न पडणे हे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुले सतत काही ना काही प्रश्न विचारत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीत वाढ होते .पण आपले दुर्दैव हे की त्या लहान मुलांना आपण कधी प्रश्न विचारू देत नाही. तर असो, पुस्तक किंवा कोणतीही संकल्पना अभ्यासताना काय? का? कसे? कोठे? केव्हा? हे प्रश्न पडू द्यावे थोड्याच दिवसात तुमच्या लक्षात येईल की ज्ञानाबाबतची तुमची जिज्ञासा वाढू लागली आहे.

अभ्यास करताना साधने खूप महत्त्वाचे असतात.

अभ्यास असो व अगर कुठलीही गोष्ट साधना शिवाय ती अपूर्ण असते. म्हणून मित्रांनो, अभ्यासामध्ये साधने खूप महत्त्वाची असतात अभ्यास करताना पुस्तकातील महत्त्वाच्या शब्दांना हायलाईट करा, वेगवेगळ्या रंगाचे पेन घ्या, त्याने तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा,अभ्यासाला ज्या टेबलावर बसता तिथे स्टिकी नोट्स लावा . संशोधनात रंगाचा वापर करून स्मरणशक्तीत खूप वाढ झालेली दिसून आली आहे. म्हणून रंगाचा वापर करून नोट्स काढा. त्याचबरोबर एखादे पुस्तक वाचल्यानंतर जेवढे तुम्ही हायलाईट केलं आहे. तेवढच वाचल्यामुळे तुमची उजळणी सुद्धा जलद गतीने होण्यास मदत होते.

अभ्यासात येणारा तणाव कसा घालवावा

एकच गोष्ट सारखीच केली तर शारीरिक व मानसिक तणाव निर्माण होत असतो. आणि त्यामुळे कधी कधी अभ्यास नकोसा वाटायला लागतो. पण अशा वेळेस थोडसं मन शांत ठेवणे गरजेचं असतं. शांत राहिले की शरीर शिथिल होतं. तसेच संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की दुपारची झोप अभ्यासासाठी खूप गरजेची असते. मात्र झोप 15 मिनिटापेक्षा जास्त नसावी आणि ती झोप अभ्यासाच्या दृष्टीने रात्री घेतलेल्या झोपेपेक्षा जास्त परिणामकारक असते.

अभ्यासासाठी संगीत महत्वाचे असते का?

काही विद्यार्थी गाणी ऐकत अभ्यास करतात तर काहींना गाणी अजिबात आवडत नाही. याचाच अर्थ अभ्यास करताना संगीत किंवा गाणी ऐकावीत का नाहीत हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे तरीही बॅराॅक म्युझिक Baroque music(संगीत)ऐकणे तुमचं मन शांत राहिला मदत करते. मात्र कोणत्याही संगीताचा आवाज आपल्याला ऐकू येईल एवढाच असावा.

अभ्यासात नियोजन म्हणजे यशस्वी जीवनाचा पाया होय

विद्यार्थी मित्रांनो व्यक्ती हा जन्मापासून ते शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून शिकत असतो. सर्वच विद्यार्थी मोठ्या पदावर जात नाहीत आणि जे जातात त्यांचा नियोजनावर अधिक भर असतो असे निरीक्षण आहे. तुम्हाला कुठला टॉपिक किती दिवसात पूर्ण करायचा आहे त्याचं नियोजन करा. आणि ते नियोजन तुम्हाला रोज दिसेल अशा ठिकाणी लावा. त्यासाठी तुम्ही महिना, आठवडा किंवा दिवस असे नियोजन करू शकता. जरुरी नसलेल्या गोष्टींना वेळ देणे बंद करा. याचा फायदा असा होईल की तुमचं ध्येय पूर्ण करण्यात सगळी ऊर्जा योग्यरीत्या कामाला येईल. दिवसात मिळालेला पूर्ण वेळ अभ्यासासाठी खर्च करा.

अभ्यासासाठी शारीरिक शारीरिक व मानसिक आरोग्य महत्त्वाचे

अभ्यासासाठी शरीर आणि मन दोन्ही निरोगी असावे लागते. तरच सर्व गोष्टी सहज साध्य होतात.
1.  रोजचा आहार पोषक घ्या.
2. रोज व्यायाम करा.
3. प्राणायाम, योग किंवा धावणे, पोहणे यातील कोणताही व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता.
4.  मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करू शकता.
5.  एखादा चित्रपट किंवा गाणी ऐकू शकता.
यामुळे तुमचं मन शांत होईल आणि मेंदू पुन्हा ताजा तवा होईल
6.रोज शरीराला आवश्यक तेवढे पाणी घ्या.

अभ्यासासाठी छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी

माझा अभ्यास कधी चांगला होतो?हे ठरवा. म्हणजे तुमचा प्राईम टाईम(Prime Time)ओळखा तो व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी का रात्री? यातील तुमच्या वेळेनुसार वेळ ठरवा. व त्यावेळेस अभ्यासाला बसा. अभ्यासाला बसताना ताट बसा. मोबाईल तुमच्या पासून लांब ठेवा. जर मोबाईल आवश्यक असेल तर मोबाईल बघून झाल्यावर डोळे थंड पाण्याने धुवा. अभ्यासाला सलग दोन तास बसू नका. 45 मिनिटे बसा व नंतर दहा मिनिटे ब्रेक घ्या. दहा मिनिटाच्या ब्रेक मध्ये हाता पायांची हालचाल करा. दीर्घ श्वसन करा. अति सर्वत्र वर्जयेत हे लक्षात ठेवा. झेपेल तेवढा अभ्यास करा. ताण घेऊन कुठल्याही पद्धतीचा अभ्यास करू नका.स्वयंसूचना  द्या तसेच त्या  स्वयं सूचना सकारात्मक वापरा.

स्वयंसूचना अभ्यासासाठी महत्त्वाच्या

अभ्यासासाठी स्वयं सूचना महत्त्वाच्या असतात. काही स्वयं सूचना पुढीलप्रमाणे-
1. माझं संपूर्ण लक्ष माझ्या अभ्यासावर एकाग्र होत आहे.
2. माझं मन एकाग्र होत आहे.
3.  मी जो आज विषय घेतला आहे तो मी सहजपणे पूर्ण करीन.
4. मी जे वाचतोय ते सारे मला समजते आत्मसात होते.
5. यातील काही जर मला परीक्षेत आठवावे लागले तर मला ते सहज आठवेल.
अशा प्रकारे तुमची जी कमजोरी असेल त्याचा विचार करून तुम्ही स्वयं सूचना देऊ शकता वरील सर्व गोष्टींचे पालन तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर विराजमान व्हाल यात शंका नसावी.







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *